Jalgaon News | शालार्थ आयडी घोटाळा, जामनेर तालुक्यातील शिक्षण संस्था चालक भाजप नेता ताब्यात


जळगाव : राज्यात शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात विशेष तपास पथकाने (एसआयटी) जामनेर येथे सोमवारी मोठी कारवाई केली.

शालार्थ आयडी घोटाळा | शिक्षणसंस्था चालक संजय गरुड चौकशीसाठी ताब्यात

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील भाजप नेते व शिक्षणसंस्था चालक संजय गरुड यांना सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. संजय गरुड हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.

तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गरुड यांच्याशी संबंधित शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेतील 177 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी अवघ्या एका दिवसात बनवण्यात आल्याचा आरोप आहे.

या संस्थेअंतर्गत जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चोपडा या चार तालुक्यांमध्ये 15 माध्यमिक शाळा कार्यरत आहेत. बनावट कागदपत्रे तयार करून बोगस नियुक्त्या केल्याचा आणि शासनाचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान गैरमार्गाने घेण्याचा मुख्य आरोप या प्रकरणी आहे.

संजय गरुड यांचा 2024 मध्ये भाजप प्रवेश

संजय गरुड यांनी यापूर्वी तीन वेळा गिरीश महाजन यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. जानेवारी 2024 मध्ये त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला होता.

शिक्षण क्षेत्रात सक्रिय असलेल्या गरुड यांच्या अटकेमुळे जळगाव जिल्ह्यात राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नाशिक विभागातील मोठा घोटाळा

शालार्थ आयडी घोटाळा हा नाशिक विभागातील मोठा घोटाळा मानला जातो. बनावट आयडी तयार करून हजारो कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे वेतन व थकबाकी दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात आतापर्यंत अनेक संस्थाचालक, शिक्षणाधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. एसआयटीने यापूर्वीही अनेकांना नोटिसा बजावल्या होत्या.

संजय गरुड यांना ताब्यात घेतल्यानंतर एसआयटीने त्यांची सविस्तर चौकशी सुरू केली आहे.

या घोटाळ्यात शासनाचा सुमारे 160 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. जळगाव जिल्ह्यातील अनेक शाळा व संस्थांशी संबंधित असल्याने तपास आणखी विस्तारित होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी पुढील कारवाई काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!