नशिराबाद येथे बुधवारी रात्री दोन अज्ञात दरोडेखोरांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना घडली.
शस्त्र घेऊन आले दरोडेखोर, धमकी देऊन मागितले दागिने
जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथे बुधवारी रात्री दोन अज्ञात दरोडेखोरांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना घडली.
दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवत घरातील रोकड आणि सोन्याचे दागिने देण्याची मागणी केली.
मात्र, पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेत डायल 112 वर संपर्क साधल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दोन अज्ञात दरोडेखोर पोलीस कर्मचाऱ्याच्या नशिराबाद येथील घरात घुसले.
त्यापैकी एका दरोडेखोराने रिव्हॉल्वरसदृश बंदूक ताणून धरली, तर दुसऱ्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या गळ्याला सुरी लावली.
त्यानंतर घरातील रोकड व सोन्याचे दागिने काढून देण्याची धमकी देत दरोडेखोरांनी कुटुंबीयांना दहशतीत ठेवले.
पोलीस कर्मचाऱ्यांनी कोंडून घेतले बाथरूममध्ये
या वेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस कर्मचाऱ्याने धाडसाने निर्णय घेतला.
त्याने स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले आणि तातडीने डायल 112 वर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून घरात दरोडेखोर घुसल्याची माहिती दिली.
नियंत्रण कक्षाकडून संबंधित पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
पोलिसांना माहिती मिळाल्याची चाहूल दरोडेखोरांना लागताच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
त्यामुळे कुटुंबीयांच्या जीविताला असलेला धोका टळला. घटनेनंतर नशिराबाद परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासले
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह विविध दिशांनी तपास सुरू करण्यात आला आहे.
दरोडेखोर नेमके कोण होते, त्यांनी घराची रेकी केली होती का आणि त्यांच्या हाती किती ऐवज लागला, याचा तपास पोलीस करीत आहेत.
पोलीस कर्मचाऱ्याने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे या सशस्त्र दरोड्याच्या घटनेत मोठी जीवितहानी टळली. दरम्यान, अज्ञात दरोडेखोरांना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.









