मुंबई/जळगाव: भारतीय जनता पक्षाचे (BJP) उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
गिरीश महाजन आणि विजय चौधरी संभाषणात आक्षेपार्ह उल्लेख
या क्लिपमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या सून तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषेचा वापर करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
या प्रकरणामुळे भाजपमध्ये अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले असून, राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
कथित संभाषणातील संवाद (सेंसर केलेल्या स्वरूपात):
विजय चौधरी: हॅलो.
गिरीश महाजन : बोला.
विजय चौधरी: या … खडसे नेहमीच … बोलत राहतो, आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवला आहे. मंत्री पदावरून काढला पाहिजे…
गिरीश महाजन : हम्म हम्म…
(संवादात दोन्ही नेत्यांकडून एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. खडसेंनी भाजप नेत्यांवर केलेल्या आरोपांचा उल्लेख करत, त्यांच्या कुटुंबीयांबाबत आक्षेपार्ह शब्दप्रयोग केले गेले आहेत.)
विजय चौधरी: … हे भाऊ काही तरी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि पार्टीला सांगितलं पाहिजे… एकतर रक्षाचा राजीनामा घ्या…
गिरीश महाजन : बरोबर… करतो करतो काही तरी इलाज करतो…
(या कथित ऑडिओ क्लिपची पुष्टी ज्ञानाचा प्रकाश करत नाही. क्लिपची सत्यता आणि संदर्भ याची स्वतंत्र पडताळणी होणे गरजेचे आहे.)
उत्तर महाराष्ट्रातील भाजपमध्ये तणाव वाढला
महाजन आणि विजय चौधरी यांच्या कथित संभाषणामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपमध्ये तणाव वाढला आहे.
रक्षा खडसे सध्या केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत, तर एकनाथ खडसे यांनी भाजपच्या स्थानिक आणि राज्यस्तरीय नेत्यांवर वारंवार टीका केली आहे.
अशा पार्श्वभूमीवर ही क्लिप समोर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
संबंधित नेते यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून यासंबंधी अधिकृत भूमिका लवकरात लवकर स्पष्ट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









