Bhusawal Energy Project | भुसावळच्या दीपनगर औष्णिक केंद्रात ‘ग्रीन हायड्रोजन’ ऊर्जानिर्मिती प्रकल्प सुरू


भुसावळ येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातही महानिर्मितीचा पहिला हरित हायड्रोजन ऊर्जानिर्मिती पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.

महानिर्मितीचा पहिला हरित हायड्रोजन ऊर्जानिर्मिती पथदर्शी प्रकल्प

देशातील ९० टक्क्यांहून अधिक रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण झाल्यावर आता पंजाबमध्ये नुकतेच ‘हायड्रोजन ट्रेन’चे लोकार्पण होत असताना भुसावळ येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातही महानिर्मितीचा पहिला हरित हायड्रोजन पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.

औष्णिक केंद्रातील टर्बो जनरेटर रोटर्स थंड करण्यासाठी लागणाऱ्या हायड्रोजनची निर्मिती आता पूर्णपणे सौरऊर्जेवर आधारित यंत्रणेतून केली जात आहे.

यामुळे हायड्रोजन निर्मितीत शून्य कार्बन उत्सर्जन साध्य झाले असून, ऊर्जानिर्मिती क्षेत्रात हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरला आहे.

वीज निर्मितीत भुसावळ व दीपनगर औष्णिक केंद्र राज्यभरात प्रसिद्ध आहेत.

राज्यातील भविष्यकालीन विजेची मागणी लक्षात घेऊन महानिर्मितीच्या दीर्घकालीन नियोजनाअंतर्गत भुसावळ येथे ५०० मेगावॉट क्षमतेचे दोन संच (संच ४ व संच ५) अनुक्रमे २०१२ आणि २०१३-१४ मध्ये कार्यान्वित करण्यात आले.

सुपरक्रिटिकल संचही कार्यान्वित

विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुपरक्रिटिकल ६६० मेगावॉट क्षमतेच्या संच क्रमांक ६ चे व्यावसायिक कार्यान्वयन २०२५ च्या सुरुवातीस (फेब्रुवारी-मार्च) करण्यात आले.

यामुळे भुसावळ केंद्राची स्थापित क्षमता एकूण १८७० मेगावॉट झाली आहे.

यामुळे केंद्राची विश्वासार्हता, उत्पादन क्षमता, कार्यक्षमता वाढली असून कमी कार्बन उत्सर्जन, इंधन बचत आणि पर्यावरणीय कामगिरीत सुधारणा झाली आहे.

हरित हायड्रोजन प्रकल्प

भुसावळ विद्युत केंद्रात महानिर्मितीचा पहिला हरित हायड्रोजन पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. शून्य कार्बन उत्सर्जन इंधन म्हणून हरित हायड्रोजनला प्रोत्साहन देण्याचे केंद्र आणि राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे.

हायड्रोजन जनरेशन प्लांटची क्षमता २० Nm³ प्रति तास असून शुद्धता ९९.९९ टक्के आहे. हा प्रकल्प ५०० किलोवॉट सौर प्रकल्पाद्वारे निर्मित ऊर्जेद्वारे संचालित होतो. (पूर्वीच्या जुन्या १९९४ च्या हायड्रोजन प्लांटची जागा घेतली आहे.)

हरित हायड्रोजन प्रकल्प महाराष्ट्रातील शाश्वत ऊर्जानिर्मितीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांची स्थापित क्षमता वाढवणे आणि कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या ‘महानिर्मिती’च्या व्यापक दृष्टिकोनाचा हा उपक्रम आहे. भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाच्या उद्दिष्टांमध्ये योगदान देत नावीन्यपूर्ण हरित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची ‘महानिर्मिती’ची वचनबद्धता अधोरेखित करते.

अभय हरणे, संचालक, महानिर्मिती, महाराष्ट्र राज्य, मुंबई

टर्बो जनरेटर रोटर्स कूलिंग’साठी आवश्यकता

औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात मोठ्या प्रमाणात तापमान निर्माण होते. टर्बो जनरेटर तासन्तास सुरू राहतात आणि त्यांना थंड करणे आवश्यक असते.

जनरेटर रोटर्स थंड करण्यासाठी सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार केलेल्या हरित हायड्रोजनचा वापर केला जातो.

फायदे काय आहेत

  • महाराष्ट्र हरित हायड्रोजन धोरणाशी सुसंगत
  • ऊर्जानिर्मिती व यंत्रणेची कार्यक्षमता वाढते
  • पारंपरिक ऊर्जेऐवजी अपारंपरिक स्रोताचा वापर
  • देशाच्या आत्मनिर्भर धोरणाशी सुसंगत प्रकल्प
  • शून्य कार्बन उत्सर्जनामुळे पर्यावरणपूरक निर्मिती

4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!