Jalgaon Mission Green City | जळगाव शहराला ‘ग्रीन सिटी’ बनवण्यासाठी भव्य मोहीम; 1 लाख वृक्षारोपणाचे नियोजन


जळगाव शहराला ग्रीन सिटी बनवण्यासाठी भव्य मोहीम; १ लाख वृक्षारोपणाचे नियोजन करण्यात आले आहे. 10 ऑगस्ट पासून मोहीम सुरू होणार आहे.

ग्रीन सिटी उपक्रमात वृक्षारोपण करण्याचे नियोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र मिशन अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिका प्रशासनाने ‘मिशन ग्रीन जळगाव सिटी’ (Mission Green Jalgaon City) ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे.

या विशेष मोहिमेअंतर्गत शहरात तब्बल १ लाख वृक्षारोपण करण्याचे भव्य नियोजन करण्यात आले आहे.

सोमवार, 10 ऑगस्ट रोजी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या मोहिमेला औपचारिक सुरुवात होणार आहे.

झाडे जगवण्याला देणार प्राधान्य

जळगाव शहराला हिरवाईची शाल पांघरणे, प्रदूषणमुक्त आणि नयनरम्य ग्रीन बनवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

झाडे लावून ती जगवणे हे प्राधान्य असल्याने महापालिका प्रशासनाने नियमित पाणीपुरवठा, ट्री-गार्ड (संरक्षक जाळ्या) आणि दीर्घकालीन देखभालीची सक्षम यंत्रणा उभारली आहे.

महापौर दीपमाला काळे व आयुक्त आदित्य जीवने यांनी स्थानिक नागरिकांना आपापल्या भागातील झाडांचे पालकत्व घेण्याचे आवाहन केले आहे.

ही मोहीम महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून महानगरपालिका, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या सहयोगाने साकार होत आहे.

प्रशासनसोबत स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

जळगावचे वाढते तापमान आणि प्रदूषण लक्षात घेता शहराला ‘ग्रीन कॉरिडॉर’ आणि संपूर्ण ग्रीन सिटी बनवणे ही काळाची गरज आहे.

प्रत्येक जळगावकराने किमान एक झाड लावून ते जगवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन महापौर दीपमाला काळे यांनी केले आहे.

ग्रीन सिटी
ग्रीन सिटी

वृक्षारोपणाचे नियोजन असे असेल

  • रस्त्यांचे सुशोभीकरण: शहरातील मुख्य रस्ते, गल्लीबोळ आणि महामार्गाच्या दोन्ही बाजूंना (डिव्हायडर व बाजूला) सावली देणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड.
  • ओपन स्पेसचा वापर: महापालिकेच्या मालकीच्या सर्व मोकळ्या जागा आणि सार्वजनिक भूखंडांवर हिरवाई फुलवणे.
  • हेमू कलानी उद्यानात मियावाकी जंगल: जपानी तंत्रज्ञानावर आधारित मियावाकी पद्धतीने अवघ्या काही काळात घनदाट जंगल उभारले जाईल. येथे तब्बल १५,००० रोपांची विशेष लागवड केली जाणार आहे.

चला, आपण सर्वजण मिळून या ‘मिशन ग्रीन जळगाव’मध्ये सहभागी होऊया आणि आपल्या जळगावला अधिक सुंदर, हिरवेगार व समृद्ध ग्रीन सिटी बनवूया!


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!