बारामती विमानतळाजवळ उद्योजकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने हल्लेखोर आला होता.
उद्योजकावर विमानतळा जवळ जीवघेणा हल्ला, हवेत गोळीबार
बारामती: बारामतीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारामती विमानतळाजवळ सायंकाळी एका नामांकित उद्योजकावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेमुळे संपूर्ण बारामती शहरात आणि विमानतळ परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने आला अन् वार केला
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ‘राणा शिपिंग कंपनी’चे मालक राणा सूर्यवंशी यांना लक्ष्य करण्यात आले आहे. सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने एक व्यक्ती सूर्यवंशी यांच्या जवळ आली. काही समजण्याच्या आतच त्या अज्ञात व्यक्तीने सूर्यवंशी यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा वार केला.
या अचानक झालेल्या हल्ल्यात सूर्यवंशी यांच्या हाताला गंभीर जखम झाली आहे.
त्यांना तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
परिसरात हवेत गोळीबार झाल्याची चर्चा
हा हल्ला झाला त्याच वेळी घटनास्थळी गोळीबार झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.
हल्लेखोरांनी किंवा त्यांच्या साथीदारांनी दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणालाही दुखापत झालेली नाही.
मात्र, हल्ल्यानंतर आणि गोळीबाराच्या आवाजामुळे विमानतळ परिसरात एकच धावपळ आणि गोंधळ उडाला.
हल्ल्याचे कारण अस्पष्ट; पोलिसांसमोर आव्हान
हल्लेखोरांनी राणा सूर्यवंशी यांच्यावर हा हल्ला का केला? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या घटनेमागे काही वैयक्तिक वाद, व्यावसायिक स्पर्धा आहे की अन्य काही कारण, याबाबतही सध्या स्पष्टता नाही. बारामती पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरू केला आहे.
मात्र, पोलिसांकडून अद्याप कोणतीही सविस्तर अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
बारामतीमधील वाढत्या गुन्हेगारीवरून राजकारण तापले
बारामतीत अलीकडच्या काळात कोयता गँगचे हल्ले, खून आणि आता थेट उद्योजकावर झालेल्या हल्ल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी नुकतेच बारामतीमधील वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य करत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता.
विधान परिषदेच्या निवडणूक प्रचारसभेत बोलताना त्यांनी बारामतीतील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली होती.
या हल्ल्यामुळे आता शहरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आणि जनतेत चर्चेत आला आहे.








