Pimpri Chinchwad Crime News : प्रेमविवाहाच्या रागातून पत्नीच्या नातेवाईकांकडून जावईसह तरुणावर हल्ला


प्रेमविवाहाच्या रागातून पत्नीच्या नातेवाईकांकडून जावईसह  तरुणावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.

प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला

पिंपरी-चिंचवड येथील सांगवी परिसरात प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

हल्लेखोरांनी धारदार लोखंडी कोयत्यांचा वापर करत तरुणाला गंभीर जखमी केले तसेच पिस्तुल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी सांगवी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

पिंपळे निलख इमारतीच्या पार्किंगमध्ये घटना

पोलिसात दाखल तक्रारीनुसार, मंगळवारी (९ सप्टेंबर) दुपारी सुमारे १२ वाजता विशालनगर, पिंपळे निलख येथील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला.

तक्रारदार अमोल अण्णासाहेब वीर (वय ३३) हे हॉटेल व्यवसाय करतात. त्यांनी सायली काळूराम लांडगे हिच्यासोबत प्रेमविवाह केला आहे.

या प्रेमविवाहाचा राग मनात धरून तिचे चुलते अनिल पांडुरंग लांडगे यांच्या सांगण्यावरून हल्ला करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

कोयत्याने वार, पिस्तूल ही रोखले

संदीप तानाजी लांडगे आणि रोहन अर्जुन लांडगे यांनी अमोल वीर यांना शिवीगाळ करत धमकी दिली. त्यानंतर धारदार लोखंडी कोयत्याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर वार केला.

संदीप लांडगे याने अमोल यांच्या हातावर आणि शरीराच्या इतर भागांवरही कोयत्याने वार केले. हल्ल्यात अमोल वीर गंभीर जखमी झाले.

आरोपी रोहन लांडगे याने संदीपला पिस्तुल काढून अमोल यांचा जीव घेण्यास सांगितले. त्यानंतर संदीपने कमरेला लावलेले पिस्तुल बाहेर काढून अमोल यांच्या दिशेने रोखले.

अमोल वीर यांच्यासोबत त्यांचे भाऊ अनिकेत सदाशिव वीर आणि दीपक नानासाहेब वीर यांनाही मारहाण करण्यात आली.

हल्ल्यानंतर आरोपींनी अमोल वीर यांच्या गळ्यातील अंदाजे तीन तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेली आणि घटनास्थळावरून पसार झाले.

सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी सांगवी पोलिसांनी संदीप तानाजी लांडगे, रोहन अर्जुन लांडगे, हर्षद काशीनाथ लांडगे आणि अनिल पांडुरंग लांडगे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी कासारवाडी परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले दोन लोखंडी कोयते, एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके सध्या शोध मोहीम राबवत आहेत.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!