पुण्यात मागील काही वर्षांपासून कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना आता थेट पोलिसावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.
पोलिसावर जीवघेणा हल्ला करून केली लूट
पुणे: शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचे दाखवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुणे रेल्वे स्थानक परिसरात ड्युटी संपवून घरी निघालेल्या एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यावर चार जणांनी धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला.
गुन्हेगारांनी केवळ हल्लाच केला नाही, तर पोलिसाच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मोबाईलही जबरदस्तीने पळवून नेला.
या हल्ल्यात पोलीस अंमलदार गंभीर जखमी झाले असून, अक्षय बोंबाळे असे त्यांचे नाव आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न (Attmpt to murder) आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरगुती वादाच्या रागातून हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास अक्षय बोंबाळे हे आपले कामकाज आटोपून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरून पायी जात होते.
त्यावेळी अक्षय यांच्या तोंडओळखीचे असलेले विकी आणि रॉकी हे त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांसह तिथे दबा धरून बसले होते. त्यांनी अचानक बोंबाळे यांना रस्त्यात अडवले.
“तू माझ्या आईला जाऊन मी गांजा आणि दारू पितो अशी खोटी चहाडी का सांगितलीस?” असा जाब विकीने बोंबाळे यांना विचारला.
यावरून आरोपींनी त्यांच्याशी जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली. हा केवळ गैरसमज असल्याचे सांगण्याचा प्रयत्न बोंबाळे यांनी केला, मात्र आरोपींचा राग अनावर झाला होता.
हात-पाय पकडून छातीवर, गळ्यावर वार
“तुला आता जिवंत सोडतच नाही,” अशी धमकी देत दोघा साथीदारांनी बोंबाळे यांचे हात-पाय घट्ट पकडून ठेवले. त्यानंतर कसलाही विचार न करता विकीने स्वतःकडील चाकू काढून बोंबाळे यांच्या गळ्यावर चालवला, तर पाठोपाठ रॉकीने त्यांच्या छातीवर वार केले.
अचानक झालेल्या या भीषण हल्ल्यामुळे बोंबाळे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. ते खाली पडताच आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि खिशातील मोबाईल हिसकावून घेतला व अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती धोक्याबाहेर, आरोपींचा शोध सुरू
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बोंबाळे यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुदैवाने, सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. या घटनेनंतर जखमी पोलीस कर्मचारी अक्षय बोंबाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विकी, रॉकी आणि त्यांच्या इतर दोन साथीदारांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच खाकी वर्दीवर हात टाकणाऱ्या या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली असून, पुढील तपास सुरू आहे.









