Pune DJ News | दहीहंडीचा दणदणाट भोवला; पुण्यात पहिला गुन्हा दाखल, साऊंड सिस्टिम जप्त


पुण्यात दहीहंडी उत्सवात परवानगीपेक्षा दुप्पट साऊंड सिस्टिम वापरल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल, साऊंड सिस्टिम जप्त करण्यात आली आहे.

दहीहंडी उत्सवात श्रीकृष्ण तरुण मंडळावर ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी गुन्हा

पुणे : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ध्वनी प्रदूषणाविरोधात पोलिसांनी कडक कारवाईला सुरुवात केली आहे.

बिबवेवाडी परिसरातील श्रीकृष्ण तरुण मंडळावर ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगीपेक्षा जास्त लाऊडस्पीकर वापरल्याचा आरोप मंडळावर आहे.

पोलिसांनी मंडळाची साऊंड सिस्टिम जप्त केली असून, मंडळाचे अध्यक्ष राहुल प्रकाश जगताप यांच्याविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

उत्सवासाठी लाऊडस्पीकरच्या वापराबाबत पोलिसांनी काही नियम निश्चित केले होते.

त्यानुसार ४ बेस आणि ४ टॉप स्पीकर वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, बिबवेवाडीतील श्रीकृष्ण तरुण मंडळाने ८ बेस आणि ८ टॉप स्पीकर लावल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

त्यामुळे परवानगीपेक्षा दुप्पट साऊंड सिस्टिम वापरल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

नागरिकांना त्रास झाल्याचा आरोप

बिबवेवाडी ओटा परिसरातील श्रीकृष्ण तरुण मंडळाने दहीहंडी कार्यक्रमासाठी पोलिसांकडून पारंपरिक वाद्यांच्या वापराची परवानगी घेतली होती.

मात्र, लाऊडस्पीकरच्या वापराबाबत देण्यात आलेल्या लेखी आदेशाचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात साऊंड सिस्टिम लावण्यात आल्याचा आरोप आहे.

त्यामुळे परिसरात ध्वनी प्रदूषण होऊन नागरिकांना त्रास झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मंडळाची साऊंड सिस्टिम जप्त केली.

दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यंदाच्या उत्सवातील ही पुण्यातील पहिली कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.

पोलीस आयुक्तांचा आधीच इशारा

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दहीहंडी उत्सवापूर्वीच ध्वनी प्रदूषणाबाबत मंडळांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या.

लाऊडस्पीकरचा मर्यादित वापर करण्यासोबतच ध्वनी प्रदूषण टाळण्याचे आवाहन करण्यात आले होते.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला होता.

दरम्यान, पुण्यात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सव उत्साहात सुरू आहे. अनेक मंडळांकडून पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करत उत्सव साजरा केला जात आहे.

काही ठिकाणी लाऊडस्पीकरऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.

मात्र, बिबवेवाडीतील या घटनेमुळे दहीहंडी उत्सवातील ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

आगामी काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर मंडळांवरही पोलिसांकडून कारवाई होते का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!