दिल्लीतील CJP आंदोलनात कोर्टात दोष सिद्ध झालेला आणि शिक्षा भोगून आलेला नक्षलवादी अरुण भेलके सहभागी झाल्याचे उघडकीस आले आहे.
CJP च्या आंदोलनावर जन संघर्ष समितीचा आक्षेप
दिल्लीतील NEET परीक्षेतील कथित पेपरफुटीविरोधात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनावरून महाराष्ट्रात नवा वाद निर्माण झाला आहे.
कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात अरुण भेलके सहभागी झाल्याचे समोर आले आहे.
भेलके यांच्यावर नक्षलवादी कारवायांशी संबंधित प्रकरणात न्यायालयाने दोष सिद्ध करून शिक्षा सुनावल्याचा दावा करण्यात येत आहे.
त्यांनी शिक्षा भोगल्यानंतर आता दिल्लीतील आंदोलनात सहभाग घेतल्याने आयोजकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अशा व्यक्तीला व्यासपीठावर का सहभागी केले
नक्षल पीडितांसाठी काम करणाऱ्या जन संघर्ष समितीने या प्रकरणावर आक्षेप घेत आंदोलनाचे आयोजक अभिजीत दीपके यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
आंदोलनात सहभागी व्यक्तींची पार्श्वभूमी तपासण्यात आली होती का, तसेच अशा व्यक्तीला व्यासपीठावर सहभागी करून घेण्यामागे नेमकी भूमिका काय होती, याची सखोल चौकशी करण्याची मागणी समितीने केली आहे.
अरुण भेलके यांनी केले वादग्रस्त वक्तव्य
दरम्यान, दिल्लीतील CJP आंदोलनादरम्यान अरुण भेलके यांनी संसदेसंदर्भात केलेले कथित वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आले आहे.
“संसद उखडून फेकून देऊ” अशा आशयाचे वक्तव्य केल्याचा दावा करत त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या वक्तव्यामुळे आंदोलनाच्या मूळ मागणीपेक्षा राजकीय आणि वैचारिक मुद्द्यांवर अधिक चर्चा सुरू झाली आहे.
भेलके यांनी केले सहभागाचे समर्थन
या पार्श्वभूमीवर भेलके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या सहभागाचे समर्थन केले. देशात लोकशाही धोक्यात असल्याचे आणि “अलोकशाही वातावरण” निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
देशात अनागोंदी माजली असून देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या मते, संसद ही या परिस्थितीचे प्रतीक बनली आहे.
संघटनात्मक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्यासारखे कायदे आणले जात असल्याचा आरोपही भेलके यांनी केला.
अशा परिस्थितीत दिल्लीत तरुणांकडून सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होऊन आपला आवाज मांडावा, असे वाटल्याने आपण CJP च्या आंदोलनात सहभागी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
NEET परीक्षेतील कथित पेपरफुटीचा मुद्दा आणि CJP आंदोलनातील सहभागींची पार्श्वभूमी यामुळे आता हे प्रकरण अधिकच चर्चेत आले असून, आयोजकांकडून याबाबत नेमके काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे









