नाशिक कुंभमेळा घोटाळा प्रकरणामध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या दोन नातलगांना पोलिसांनी अटक केली आहे. बनावट सही करून 591 कोटींची वर्क ऑर्डरचे हे प्रकरण आहे.
कुंभमेळा फसवणूक रॅकेटमध्ये दोघे आरोपी जामनेर मतदार संघातील
नाशिक : कुंभमेळा च्या नावाखाली सुरू झालेल्या फसवणुकीच्या रॅकेटमध्ये मोठा खुलासा झाला आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या दोन नातलगांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या बनावट सहींनी तब्बल 591 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर काढण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघातील तनय अनंत महाजन आणि नरेंद्र महाजन यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
नाशिक रोड पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आतापर्यंत पाच बनावट वर्क ऑर्डर समोर आल्या असून त्यांची एकूण किंमत कागदावर 591 कोटी रुपये दाखवण्यात आली आहे.
यातील एका प्रकरणात सुमारे 3 कोटी 5 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचेही समोर आले आहे.
नियोजनावरच अनेक प्रश्न उपस्थित
35 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीसह होणाऱ्या कुंभमेळ्याच्या नियोजनावर विरोधक आणि साधूंनीही प्रश्न उपस्थित केले असतानाच, कुंभमेळ्याच्या नावाने राज्यात असे फसवणुकीचे रॅकेट सुरू झाले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
कुंभमेळ्याची जबाबदारी सोपवून ज्यांना कुंभमेळा मंत्री केले, त्या गिरीश महाजन यांच्या नातलगांचाच यात सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
नातेवाईक असला तरी गय केली जाणार नाही : मंत्री महाजन
गिरीश महाजन यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, “तो माझा दूरचा नातेवाईक आहे. पण तो फार वाया गेलेला आहे. पूर्वीपासूनच त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत. यामध्ये सात-आठ लोक सापडतील आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. हा गुन्हा अक्षम्य आहे. नातेवाईक असला तरी गय करणार नाही.”
कुंभमेळ्याच्या नियोजनावरून सातत्याने प्रश्न उपस्थित होत असतानाच आलेल्या या घोटाळ्याने मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही टीकेचे हल्ले होण्याची शक्यता आहे.









