जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना हडपसर भागातून पोलीस पथकाने पकडले आहे. दोघा आरोपींकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहेत.
माहिती मिळताच पोलीस पथकाने केली कारवाई
सदर गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपी करण शिवाजी जामदार याच्याकडे अधिक बारकाईने व कसून तपास सुरू असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण, नितीन वाघमारे आणि अंमलदार राजू तोरे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपीकडे अजूनही अवैध अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे आहेत.
आरोपीला पोलीस खाक्या दाखवताच त्याने कबूल केले की त्याच्याकडील अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे त्याने आपल्या दोन मित्रांकडे सुपूर्द केली आहेत.
हे दोघे मित्र म्हणजे समीर कालींदर शेख (वय २८, रा. चारवाडा, साई कॉर्नर, केशवनगर, मांजरी बुद्रुक रोड, हडपसर) आणि ओंकार नारायण गाडेकर (वय २३, रा. चारवाडा, धनश्री बालाजी ट्रेडर्स, केशवनगर, मांजरी बुद्रुक रोड, हडपसर) आहेत. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे आरोपीने सांगितले.
तपास पथकातील पोलिसांनी कसून शोध घेत शिताफीने या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अग्निशस्त्र व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
सदर अग्निशस्त्र व काडतुसे गुन्ह्याचे महत्त्वाचे पुरावे म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
ही कारवाई पोलिसांच्यासतर्क तपासामुळे यशस्वी झाली आहे.









