पत्रकार असल्याची बनावट ओळख दाखवत नागरिकांकडून खंडणी मागण्याच्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.
पत्रकार असल्याची दिली बनावट ओळख
जळगाव : पत्रकार असल्याची बनावट ओळख दाखवत नागरिकांकडून खंडणी मागण्याच्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे कोमल बापुराव पाटील आणि जितेंद्र रूपसिंग चौधरी अशी आहेत.
याबाबत रफीक कुरेशी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
दोघांनी दिली धमकी
फिर्यादीनुसार, दोघांनी तक्रारदारास धमकी देत सांगितले की, “तुमच्याकडे बंदी असलेले मांस आहे. पोलिस कारवाई टाळायची असेल तर आम्हाला पाच लाख रुपये द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.”
पाच लाख रुपये न मिळाल्याने या दोन तोतया पत्रकारांनी पोलिसांना माहिती दिली आणि एमआयडीसी पोलिस घटनास्थळी पोहोचले.
मात्र तपास करताना हे उघड झाले की, या दोघांनीच आधी तक्रारदार रफीक कुरेशी यांच्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
बनावट पत्रकारांविरुद्ध गुन्हा
या प्रकरणी तक्रारदार रफीक कुरेशी यांच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन तोतया पत्रकारांविरुद्ध रितसर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पत्रकार असल्याची बतावणी करून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्याने या घटनेची शहरात चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय राजेंद्र उगले करत आहेत.









