पुण्यात छत्तीसगड टुरिझम बोर्डचा रोडशो
राज्यातील वन्यजीव, वारसा आणि आध्यात्मिक पर्यटनाला नवी चालना
पुणे, ३१ जुलै २०२६ : छत्तीसगडला विरंगुळा, वन्यजीव, वारसा आणि आध्यात्मिक पर्यटनासाठी उदयोन्मुख पर्यटनस्थळ म्हणून देशभरात अधिक प्रभावीपणे सादर करण्याच्या उद्देशाने छत्तीसगड टुरिझम बोर्ड ने उद्योग भागीदार फिक्की यांच्या सहकार्याने आज पुण्यातील हयात रीजेन्सी येथे यशस्वी छत्तीसगड टुरिझम रोडशो आयोजित केला.
या रोडशोमध्ये छत्तीसगडमधील आघाडीचे टूर ऑपरेटर्स, हॉटेल व्यावसायिक आणि ट्रॅव्हल एजंट्स यांनी पुणे तसेच महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाशी संबंधित प्रतिनिधींशी बी२बी नेटवर्किंग आणि चर्चासत्रांद्वारे संवाद साधत व्यावसायिक सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेतला.
या कार्यक्रमाला छत्तीसगड टुरिझम बोर्ड चे अध्यक्ष श्री नीलू शर्मा, छत्तीसगड टुरिझम बोर्ड चे व्यवस्थापकीय संचालक श्री विवेक आचार्य (आयएफएस) तसेच फिक्की छत्तीसगड टुरिझम समिती चे अध्यक्ष आणि छत्तीसगड ट्रॅव्हल ट्रेड असोसिएशन चे अध्यक्ष श्री जसप्रीत सिंह भाटिया उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना श्री नीलू शर्मा म्हणाले, “भारतातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून छत्तीसगडची ओळख अधिक बळकट करण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे. हॉटेल व्यावसायिक, ट्रॅव्हल एजंट्स आणि टूर ऑपरेटर्स यांच्याशी झालेला संवाद अत्यंत फलदायी ठरला. आम्ही सर्व पर्यटन क्षेत्रातील भागीदारांना छत्तीसगडचा समृद्ध आणि अस्सल अनुभव घेण्यासाठी मनःपूर्वक आमंत्रित करतो.”
श्री विवेक आचार्य (आयएफएस) म्हणाले, “पर्यटनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यासोबतच पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी छत्तीसगड टुरिझम बोर्ड ने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. पुणे आणि महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाशी संबंधित भागीदारांनी राज्यातील विविध पर्यटन सर्किट्स आणि अनुभवांच्या प्रसारासाठी आमच्यासोबत सहकार्य करावे, असे आम्ही आवाहन करतो. विरंगुळा, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि साहसी पर्यटनासाठी छत्तीसगड हे आज देशातील पसंतीच्या पर्यटनस्थळांपैकी एक बनत आहे. निसर्ग, संस्कृती, वारसा आणि साहस यांचा सुंदर संगम असलेल्या या राज्याची उदयोन्मुख पर्यटनस्थळ म्हणून ओळख अधिक दृढ करण्यास हा रोडशो निश्चितच मदत करेल.”
श्री जसप्रीत सिंह भाटिया म्हणाले, “छत्तीसगड टुरिझम बोर्डसोबतच्या भागीदारीमुळे राज्याचा समृद्ध वारसा, वन्यजीव, आध्यात्मिक पर्यटन सर्किट्स आणि आदिवासी संस्कृती यांचा अधिक व्यापक स्तरावर प्रचार करण्याच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. अशा रोडशोमुळे पर्यटन उद्योगातील अर्थपूर्ण सहकार्याला चालना मिळून छत्तीसगडला भारतातील सर्वाधिक आकर्षक आणि उदयोन्मुख पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून स्थान मिळण्यास मदत होईल.”
हा रोडशो छत्तीसगड टुरिझम बोर्ड च्या राज्याबाहेरील पर्यटन बाजारपेठ विस्तारण्याच्या आणि देशातील महत्त्वाच्या शहरांतील पर्यटन व्यवसायाशी थेट संबंध प्रस्थापित करण्याच्या उपक्रमाचा एक भाग आहे. देशातील विविध शहरांमध्ये अशा एकूण आठ रोडशोचे आयोजन करण्यात येणार असून, ओडिशातील भुवनेश्वर येथे पहिला रोडशो पार पडल्यानंतर पुणे हा दुसरा रोडशो ठरला आहे.
नैसर्गिक सौंदर्य, प्राचीन वारसा आणि समृद्ध आदिवासी संस्कृतीने नटलेले छत्तीसगड पर्यटकांसाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण आकर्षणे घेऊन उभे आहे. चित्रकोट धबधबा, कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यान, सिरपूर आणि भोरमदेव मंदिर यांसारखी स्थळे पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देतात. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध प्रचारात्मक उपक्रमही सातत्याने राबविण्यात येत आहेत.
दिवसभर चाललेल्या या रोडशोची सुरुवात बी२बी नेटवर्किंग सत्रांनी झाली. पुण्यातील टूर ऑपरेटर्स आणि छत्तीसगडमधील पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधींनी या सत्रांमध्ये व्यावसायिक सहकार्य आणि पर्यटनस्थळांच्या प्रसाराच्या संधींवर सविस्तर चर्चा केली. सायंकाळी छत्तीसगडच्या समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडविणारा रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर आयोजित नेटवर्किंग डिनरसह एकदिवसीय रोडशोचा समारोप झाला. या उपक्रमामुळे पर्यटन विकासासाठी भविष्यातील सहकार्याला नवी दिशा मिळणार आहे.
छत्तीसगड टुरिझम बोर्ड विषयी
छत्तीसगड टुरिझम बोर्ड ही छत्तीसगड राज्यातील पर्यटनाचा विकास आणि प्रचार करण्यासाठी कार्यरत असलेली प्रमुख संस्था आहे. राज्यातील निसर्गसौंदर्य, सांस्कृतिक वारसा, आदिवासी परंपरा, वन्यजीव, धबधबे, पुरातत्त्वीय वारसा आणि आध्यात्मिक स्थळांचा प्रभावी प्रचार करून छत्तीसगडला भारतातील पसंतीचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. पर्यटन पायाभूत सुविधा, प्रभावी विपणन, उद्योग भागीदारी आणि शाश्वत पर्यटन उपक्रमांच्या माध्यमातून पर्यटकांचा अनुभव समृद्ध करण्याबरोबरच स्थानिक समुदायांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि राज्यातील पर्यटन परिसंस्था अधिक सक्षम करणे हे छत्तीसगड टुरिझम बोर्ड चे उद्दिष्ट आहे.
फिक्की विषयी
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) ची स्थापना १९२७ मध्ये झाली. भारतातील ही सर्वात जुनी आणि सर्वात मोठी उद्योग संघटना असून ती एक स्वयंसेवी, नाफा न कमावणारी संस्था आहे. भारतातील उद्योग आणि व्यापार क्षेत्राचा प्रभावी आवाज म्हणून फिक्की कार्य करते. धोरणनिर्मिती, उद्योग क्षेत्रातील संवाद आणि विविध क्षेत्रांमधील समन्वय साधण्याबरोबरच देशातील खासगी व सार्वजनिक उद्योग, बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच विविध राज्यांतील वाणिज्य आणि उद्योग मंडळांना एकत्र आणण्याचे कार्य फिक्की करते. भारतातील उद्योग, धोरणकर्ते आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक समुदाय यांच्यातील संवादासाठी फिक्की हे एक महत्त्वाचे व्यासपीठ मानले जाते.









