Pune Water Crisis: पुण्यात पाण्याचे संकट गडद; आगामी काळात लोकसंख्या १ कोटी पार, २३.२० टीएमसी पाण्याची गरज


शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, आगामी काळात पुणेकरांसमोर पाण्याचे गंभीर संकट उभे ठाकण्याची चिन्हे आहेत.

पाण्याचे गंभीर संकट रोखण्यासाठी नियोजन हवे

पुणे: शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, आगामी काळात पुणेकरांसमोर पाण्याचे गंभीर संकट उभे ठाकण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेच्या अंदाजानुसार, २०३२-३३ पर्यंत शहराची लोकसंख्या एक कोटी पार जाण्याची शक्यता असून, या वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी वर्षाला तब्बल २३.२० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी अतिरिक्त पाणी कोट्यासाठी राज्य सरकारच्या मुख्य सचिवांकडे धाव घेतली असून, जलसंपदा विभागाकडे सहकार्याची मागणी केली आहे.

२०५५ पर्यंत लोकसंख्या होणार दोन कोटी!

पुणे महापालिकेच्या अहवालानुसार, सध्या शहराची लोकसंख्या सुमारे ८१.६४ लाख आहे.

या लोकसंख्येसाठी सध्या वर्षाला २१.४० टीएमसी पाण्याची गरज भासत आहे.

मात्र, जलसंपदा विभागाकडून २०२५-२६ या वर्षासाठी महापालिकेला केवळ १४.६१ टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्यात आला आहे.

मागणी आणि पुरवठ्यातील ही तफावत आताच चिंताजनक आहे.

त्यातच लोकसंख्या वाढीचा हाच वेग कायम राहिल्यास, २०NT५५-५६ पर्यंत पुण्याची लोकसंख्या दोन कोटींच्या घरात पोहोचेल आणि त्यावेळी शहराला तब्बल ४६.०६ टीएमसी पाण्याची गरज भासणार आहे.

नवीन गावांच्या पाण्यासाठी मुळशी आणि खडकवासलावर डोळा

शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने दोन महत्त्वाचे प्रस्ताव तयार केले आहेत:

  • मुळशी धरणातून ७ टीएमसी पाणी: समाविष्ट गावांची तहान भागवण्यासाठी मुळशी धरणातून ७ टीएमसी पाणी कोटा मिळावा, असा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे प्रलंबित आहे.
  • खडकवासला धरणातून ४ टीएमसी पाणी: उंड्री, पिसोळी, मांजरी, फुरसुंगी या पूर्व भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी खडकवासला धरण साखळीतून अतिरिक्त ४ टीएमसी पाणी उचलण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी १२ किलोमीटर लांबीची भूमिगत जलवाहिनी आणि दोन पाणी उपसा केंद्रे उभारली जाणार आहेत.

भविष्यातील पाण्याचे नियोजन मोठे आव्हान

मुळशी आणि खडकवासला धरणांतून अतिरिक्त पाणी मिळवण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी २०५५ मधील ४६.०६ टीएमसी पाण्याची अवाढव्य गरज कशी भागवायची, हा महापालिकेसमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे.

अतिरिक्त पाणी कोटा न मिळाल्यास भविष्यात पुणेकर विरुद्ध जिल्हावासीय असा पाण्याचा संघर्ष तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे पाण्याचे स्त्रोत वाढवणे आणि पाण्याचा सुयोग्य वापर करणे हेच आता पुण्याचे भवितव्य ठरवणार आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!