जळगाव : इच्छा असेल तिथे मार्ग दिसतो, हे सिद्ध करून दाखवलं आहे 72 वर्षांच्या आजोबांनी. केळी शेतीतून त्यांनी 30 लाख कमावले आहेत.
केळी शेतीतून लाखो रुपयांचा नफा
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील नांदवेल गावातील मुरलीधर पाटील यांनी केळी शेतीतून लाखो रुपयांचा नफा कमावला आहे.
पारंपरिक शेती सोडून बागायतीकडे वळल्याने त्यांचे आयुष्य बदलले. वय हे फक्त आकडा असतो, हे वाक्य अनेकदा ऐकतो. मात्र, 72 वर्षांच्या मुरलीधर पाटील यांनी हे वास्तवात सिद्ध केले आहे.
वयाची सत्तरी ओलांडली तरी मेहनत आणि उमेद कायम
सामान्यतः वयाची सत्तरी ओलांडल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिक नातवंडांसोबत विश्रांती घेतात. पण मुरलीधर पाटील यांच्या अंगात अजूनही मेहनतीचा आणि उमेदीचा असा अंगार आहे की, त्यांनी संपूर्ण शिवार उजळून टाकला आहे.
पारंपरिक पद्धत सोडली, आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले
गेल्या १५ वर्षांपासून मुरलीधर पाटील केळी ची शेती करत आहेत. सुरुवातीला पारंपरिक कंद पद्धतीने केली लागवड करत होते.
त्यात कष्ट अधिक आणि नफा कमी होता. काळ बदलतोय तर शेतीही बदलायला हवी, या विचाराने त्यांनी जुनी पद्धत सोडून दिली आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला.
त्यांनी G9 सुधारित टिश्यू कल्चर रोपांची लागवड केली. नऊ एकर क्षेत्रात केळी ची लागवड करताना केवळ खतं-औषधं नव्हे तर स्वतःचा घाम आणि जिवापाड माया ओतली.
नऊ एकरात केळीची लागवड
गेल्या वर्षी जुलै महिन्यात नऊ एकरांत लागवड केळी. रोपे, संगोपन, खतं आणि औषधांसह सुमारे 12 लाख रुपयांचा खर्च आला.
यंदा मार्च, जून आणि जुलै महिन्यात तीन टप्प्यांत तोडणी झाली. बाजारात भाव चांगले मिळाले; प्रति क्विंटल 2800 रुपयांपर्यंत दर मिळाला.
एकूण 42 लाख रुपयांचे उत्पन्न झाले. सर्व खर्च वजा जाता मुरलीधर पाटील यांच्या हातात निव्वळ 30 लाख रुपयांचा नफा उरला.
ही यशोगाथा दाखवते की, इच्छाशक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाने वय कोणतेही असले तरी शेतीत नफा कमवता येतो. मुरलीधर पाटील सारखे शेतकरी इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.









