Pune News : सहप्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटणारा सराईत चोरटा स्वारगेट पोलिसांच्या जाळ्यात; तीन गुन्हे उघड


गुंगीच्या गोळ्या देऊन त्यांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका ६३ वर्षीय सराईत आंतरराज्यीय चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे.

गुंगीचे औषध देऊन लुटणारा चोरटा स्वारगेट पोलिसांच्या जाळ्यात

पुणे: एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गुंगीच्या गोळ्या देऊन त्यांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका ६३ वर्षीय सराईत आंतरराज्यीय चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे.

बाबू भुरे खान (वय ६३, रा. मंदसौर, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून स्वारगेट पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यातील १ लाख ४० हजार रुपये किमतीची १ तोळा सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे.

बनावट नाव सांगून करायचा चोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट २०२६ रोजी बोरिवली ते स्वारगेट दरम्यान ‘शिवशाही’ एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठ प्रवाशाशी आरोपीने ‘संजय अगरवाल’ असे बनावट नाव सांगून ओळख वाढवली.

प्रवाशाची नजर चुकवून त्याने त्यांना गुंगीचे औषध दिले. प्रवासी बेशुद्ध होताच आरोपीने त्यांच्या हातातील १० ग्रॅमची सोन्याची अंगठी चोरून पळ काढला होता.

याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाने आवळल्या मुसक्या

स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने बसमधील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढला.

अखेर मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आरोपी बाबू भुरे खान याला ताब्यात घेण्यात आले.

८ वर्षे जेलमध्ये राहूनही गुन्हेगारी सुरूच

पोलीस कोठडी दरम्यान झालेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी अशाच प्रकारच्या दोन गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते.

तब्बल ८ वर्षांची शिक्षा भोगून तो २०२५ मध्येच जेलमधून बाहेर आला होता. जेलमधून सुटल्यानंतर त्याने पुन्हा हे गुन्हे करण्यास सुरुवात केली.

त्याने स्वारगेट येथील गुन्ह्याव्यतिरिक्त नागपूरमधील रामटेक पोलीस ठाणे आणि गुजरात मधील द्वारका पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारे चोरी केल्याची कबुली दिली आहे.

आरोपीने चोरलेले दागिने मुंबईच्या झवेरी बाजारातील एका दुकानदाराला विकले.

पोलिसांनी त्या दुकानदाराला तपासासाठी नोटीस बजावली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!