रेल्वे मार्गाच्या कमिशनिंगसाठी आणि पायाभूत सुविधांच्या अंतिम टप्प्यातील कामांसाठी ३ आणि ४ ऑक्टोबर रोजी पुणे रेल्वे विभागात मोठा महा-ब्लॉक घेण्यात आला आहे.
पुणे रेल्वे विभागात मोठा महा-ब्लॉक मुळे अनेक गाड्या रद्द
पुणे: हडपसर–घोरपडी दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कमिशनिंगसाठी आणि पायाभूत सुविधांच्या अंतिम टप्प्यातील कामांसाठी ३ आणि ४ ऑक्टोबर रोजी पुणे रेल्वे विभागात मोठा महा-ब्लॉक घेण्यात आला आहे.
पुणे आणि हडपसर यार्डमधील उपकरणांशी संबंधित तांत्रिक कामांमुळे या दोन दिवसांत रेल्वे वाहतुकीवर प्रचंड परिणाम होणार आहे.
अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, तर काही गाड्या अंशतः चालवल्या जाणार आहेत.
त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
३ ऑक्टोबर रोजी रद्द झालेल्या गाड्या
महा-ब्लॉकच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच ३ ऑक्टोबरला पुणे-सोलापूर इंटरसिटी, सोलापूर-पुणे इंटरसिटी, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, सोलापूर-सीएसएमटी एक्स्प्रेस, दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस आणि अमरावती-पुणे एक्स्प्रेस या प्रमुख गाड्या रद्द राहतील.
याशिवाय पुणे-दौंड आणि पुणे-बारामती मार्गावरील काही डेमू गाड्या देखील धावणार नाहीत.
४ ऑक्टोबर रोजी परिणाम आणखी व्यापक
४ ऑक्टोबर रोजी या महा-ब्लॉकचा परिणाम अधिक तीव्र असेल. पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे मार्गावरील अनेक एक्स्प्रेस गाड्यांसह पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर, पुणे-शिर्डी, पुणे-अमरावती, तसेच पुणे-दौंड, पुणे-सातारा आणि पुणे-लोणावळा मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे प्रभावित होणार आहे.
पुणे-दौंड मार्गावरील काही गाड्या या दिवशीही रद्द राहतील.
लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलले
३ ऑक्टोबर रोजी पुणे-हावडा दुरंतो एक्स्प्रेस लोणावळा-कर्जत-पनवेल-कल्याण-इगतपुरी-मनमाड या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त इतर काही लांब पल्ल्याच्या गाड्या दौंड-कुर्डुवाडी-मिरज-सातारा किंवा दौंड-अहिल्यानगर-मनमाड मार्गे धावतील.
मार्ग बदलल्यामुळे या गाड्यांना त्यांच्या नियमित मार्गावरील काही स्थानकांवर थांबा मिळणार नाही.
खडकी येथून अंशतः परिचालन
या महा-ब्लॉक दरम्यान गाड्यांचे पुणे आणि हडपसर येथील परिचालन बदलण्यात आले आहे.
इंदूर-दौंड आणि जोधपूर-हडपसर एक्स्प्रेस खडकी स्थानकावर अंशतः समाप्त केल्या जातील, तर परतीच्या प्रवासासाठी या गाड्या खडकी येथूनच मार्गस्थ होतील.
हडपसर-काझीपेट एक्स्प्रेसच्या परिचालनातही बदल करण्यात आला असून काही गाड्या दौंड किंवा कुर्डूवाडी येथून अंशतः सुरू केल्या जातील.
१९ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या या कामांचा हा अंतिम टप्पा असल्याने प्रवाशांनी रेल्वे हेल्पलाइन किंवा अधिकृत ॲपवर आपल्या गाडीचा क्रमांक आणि अद्ययावत स्थिती तपासूनच प्रवासाला सुरुवात करावी.









