Pune Protest Against DJ | डीजे च्या आवाजाविरोधात बोलले, सोसायटीने वाळीत टाकले; पुण्याच्या वर्षा कदम यांनी मांडली वडिलांच्या मृत्यूची कहाणी


डीजे च्या जीवघेण्या आवाजाविरोधात बोलले म्हणून मैत्रिणींनी बोलणे बंद केले, सोसायटीने वाळीत टाकले आणि शेवटी मला माझ्या वडिलांना डोळ्यादेखत गमवावे लागले,”

डीजे च्या आवाजाविरोधात बोलले म्हणून मैत्रिणींनी बोलणे बंद केले

पुणे: “डीजे च्या जीवघेण्या आवाजाविरोधात बोलले म्हणून मैत्रिणींनी बोलणे बंद केले, सोसायटीने वाळीत टाकले आणि शेवटी मला माझ्या वडिलांना डोळ्यादेखत गमवावे लागले,” अशा शब्दांत पुणेकर महिला वर्षा कदम यांनी ढसाढसा रडत आपली व्यथा मांडली.

पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या डीजे आणि लाऊडस्पीकरच्या ध्वनीप्रदूषणाविरोधात आज पुणेकरांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले, या मोर्चात वर्षा कदम बोलत होत्या.

पुण्याचे नागरिक विद्यानंद बापट यांनी पुणे महापालिकेत डीजेविरोधात आवाज उठवल्यानंतर, काही गणेश मंडळांनी त्यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे.

दरम्यान, बापट यांना एका गणेशभक्ताने कानशिलात लगावल्याची घटना घडल्याने हे प्रकरण अधिक तापले आहे. या पार्श्वभूमीवर आज पुणेकरांनी डीजेविरोधात मूक मोर्चा काढला होता.

या मोर्चाला बापट स्वतः उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र शेकडो नागरिकांनी यात सहभाग नोंदवला.

“१० वर्षे वडिलांच्या खोलीची खिडकी उघडली नाही”

आपली परिस्थिती सांगताना वर्षा कदम म्हणाल्या, “माझ्या मुलाला गेल्या ५ वर्षांपासून ‘फिट्स’ (फेफरे) येण्याचा त्रास आहे, तर वडील गंभीर आजारी होते.

त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही पहिल्या मजल्यावर घर घेतले होते. परंतु, उत्सवातील डीजेच्या आवाजामुळे भिंतींना कंप सुटतात.

वडिलांना त्रास होऊ नये म्हणून गेली १० वर्षे आम्ही त्यांच्या खोलीची खिडकी उघडली नव्हती.

डीजेच्या त्रासापासून वाचण्यासाठी आम्ही अनेकदा गणपतीच्या दिवसांत घराबाहेर पडायचो किंवा सोसायटीच्या आठव्या मजल्यावरील ‘रिफ्युजी एरिया’मध्ये जाऊन डास आणि अंधारात रात्र काढायचो.”

“त्रासाविरोधात बोललो तर ‘धर्मविरोधी’ ठरवले”

“आम्हाला होणाऱ्या त्रासाविरोधात जेव्हा आम्ही आवाज उठवला, तेव्हा ‘तुम्ही धर्माच्या विरोधात बोलताय’ असा आरोप आमच्यावर केला गेला.

सोसायटीने आम्हाला वाळीत टाकले आहे, मैत्रिणींनी बोलणे बंद केले आहे. इतर शेजाऱ्यांनाही याचा त्रास होतो, पण आपल्यालाही वाळीत टाकले जाईल या भीतीने कोणी बोलत नाही.

उलट आम्हाला घर विकून दुसरीकडे जाण्याचा सल्ला दिला जातोय,” असा उद्वेग कदम यांनी व्यक्त केला.

…आणि वडिलांनी डोळ्यांदेखत प्राण सोडले!

वडिलांच्या निधनाचा तो काळजाला पीळ पाडणारा प्रसंग सांगताना वर्षा कदम यांना अश्रू अनावर झाले.

त्यांनी सांगितले, “वडिलांवर उपचार सुरू होते आणि त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला.

पुण्यात नवरात्रीचा उत्सव सुरू असताना साऊंड सिस्टीमचा आवाज प्रचंड मोठा होता. वडिलांची तब्येत खालावत असल्याने आम्ही आवाज कमी करण्याची वारंवार विनवणी केली, पण कोणीही ऐकले नाही.

अखेर या त्रासाला कंटाळून मी वडिलांना गावी घेऊन गेले. पण तिथे गेल्यावर अवघ्या दोनच दिवसांत त्यांनी माझ्या डोळ्यांदेखत प्राण सोडले.

त्यांना जर पुण्यात सुखाने राहू दिले असते, तर तब्येत बिघडल्यावर तातडीने रुग्णालयात नेता आले असते आणि कदाचित ते आज जगले असते.”

ध्वनीप्रदूषणाच्या या भीषण वास्तवामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज एका कुटुंबाला आपले छत्र गमवावे लागल्याने, या मोर्चामध्ये उपस्थित असलेल्या इतर नागरिकांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे.


5
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!