Sharad Pawar News : जळगावात शरद पवार-अजित पवार गटाच्या एकत्रीकरणाच्या चर्चेला पुन्हा उधाण


राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चेला जळगाव जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा जोर आला.

शरद पवार आणि अजित पवार गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चेला जोर

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चेला जळगाव जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा जोर आला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथील अमृत महोत्सवी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे रविवारी सकाळी जळगाव विमानतळावर आगमन झाले.

यावेळी त्यांच्या स्वागतासाठी पवार गटासोबतच अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन्ही गटांचे पदाधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहिल्याने या घडामोडीची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गट वेगवेगळ्या राजकीय आघाड्यांमध्ये असले, तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमधील संबंध कायम असल्याचे या निमित्ताने दिसून आले.

विशेष म्हणजे, यापूर्वी अजित पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतानाही दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले होते.

त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील स्थानिक पातळीवरील संबंध आणि भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

‘दोन्ही गटांची विचारधारा एकच’

या घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. दोन्ही पक्ष वेगळे झाले असले, तरी त्यांची मूळ विचारधारा आजही एकच असल्याचे त्यांनी सांगितले.

“दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, तर त्याचे आम्ही स्वागतच करू. दोन्ही गटांची विचारधारा बहुजन हिताची आहे. सध्या ते यूपीएसोबत, तर आम्ही एनडीएसोबत आहोत.

 त्यामुळे राजकीयदृष्ट्या दोन्ही गट वेगवेगळ्या मार्गावर असले, तरी वैचारिक पातळीवर आमच्यात साम्य आहे,” असे प्रमोद पाटील यांनी स्पष्ट केले.

पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चेला जळगाव जिल्ह्यात आणखी बळ मिळाले आहे.

मात्र, प्रत्यक्षात दोन्ही गट एकत्र येण्याबाबत कोणताही अधिकृत निर्णय किंवा घोषणा झालेली नाही.

त्यामुळे विमानतळावरील या भेटीगाठी आणि स्थानिक नेत्यांच्या वक्तव्यांमुळे निर्माण झालेली राजकीय चर्चा पुढे कोणते वळण घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 


5
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!