Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशी निमित्त अमळनेरला विठ्ठल भक्तीचा महासागर उसळला

अमळनेर सखाराम महाराज मंदिर

प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडीत आषाढी एकादशी निमित्त शुक्रवारी पहाटेपासून भाविकांची प्रचंड गर्दी दिसून आली.

आषाढी एकादशी निमित्त असंख्य वारकरी दाखल

शहर व ग्रामीण भागातील हजारो वारकऱ्यांनी पायी दिंड्या, पालख्या व टाळ-मृदुंगाच्या गजरात वाडीत प्रवेश केला. “विठ्ठल… विठ्ठल…” आणि “ज्ञानोबा-तुकाराम” या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय व आनंदी वातावरणाने भरून गेला.

पहाटेपासूनच श्री संत सखाराम महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.

महिला, पुरुष, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह सर्वच वयोगटातील भक्तांनी मनोभावे दर्शन घेतले. खेड्यापाड्यांतून आलेल्या दिंड्यांमधील वारकरी भगव्या पताका, टाळ व मृदुंग घेऊन पूर्ण भक्तिरसात तल्लीन झाले होते. वाडीत पाऊल टाकताच पंढरपूरात आल्याची अनुभूती प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

आषाढी एकादशी च्या यात्रेच्या  निमित्ताने दुकानांची रेलचेल

मुख्य दर्शनानंतर भाविकांनी वाळवंटातील समाधी मंदिरात जाऊन संत सखाराम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि मनोभावे पूजा-अर्चा केली.

दिवसभर मंदिर परिसरात वारकरी संप्रदायाची परंपरा आणि भक्तीचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला.

आषाढी एकादशी च्या या यात्रेच्या स्वरूपात वाडी परिसरात विविध दुकानांची रेलचेल होती.

पूजेची साहित्य, फुले, हार, प्रसाद, खेळणी आणि विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर भाविकांची मोठी गर्दी होती. यामुळे संपूर्ण वाडी यात्रेच्या उत्साहाने फुलून गेली होती.

नितीन भदाणे यांची भव्य रांगोळी ठरले आकर्षण

अनेक भाविकांनी भावना व्यक्त करताना सांगितले, “आमच्यासाठी हे ठिकाणच पंढरपूर आहे. येथे विठूरायाचे दर्शन घेतल्यावर मनाला खूप समाधान मिळते.”

संत सखाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांनी सुख, समृद्धी आणि कल्याणाची प्रार्थना केली.

यंदाच्या आषाढी एकादशी चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रंगोली कलाकार नितीन भदाणे यांची भव्य रांगोली. काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या सभामंडपाचे वास्तवदर्शी चित्रण त्यांनी रांगोळीद्वारे साकारले. या कलाकृतीतून वाडीच्या पुनर्बांधणीची प्रेरणा प्रभावीपणे मांडण्यात आली. भाविकांनी या रांगोळीचे भरभरून कौतुक केले आणि अनेकांनी छायाचित्रे काढून जतन केले.

आषाढी एकादशी निमित्त संत सखाराम महाराज वाडीत भक्ती, श्रद्धा, वारकरी परंपरा आणि उत्साहाचा अद्भुत संगम पाहायला मिळाला.

दिंड्यांचा उत्साह, विठ्ठलनामाचा अखंड गजर आणि हजारो भाविकांची गर्दी यामुळे अमळनेरचे ‘प्रति पंढरपूर’ हे बिरूद पुन्हा एकदा सार्थ ठरले.


1
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!