Pune Crime News: ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या चोरट्याला फरासखाना पोलिसांनी केली ८ तासांत अटक


पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या चोरट्याला फरासखाना पोलिसांनी  ८ तासांत अटक केली आहे.

श्री कसबा गणपती मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या चोरट्याला अटक

पुणे: पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या ऐतिहासिक श्री कसबा गणपती मंदिरात दानपेटी फोडून रोकड लांबवणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आणि वेगाने तपास करत बेड्या ठोकल्या आहेत.

संग्राम राजेंद्र जाधव (वय २९, रा. गडहिंग्लज, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकी घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीने मुख्य दरवाजा बंद असताना मंदिराच्या शेजारील नूतनीकरण सुरू असलेल्या एका वाड्यातून आत प्रवेश केला.

वाड्याची भिंत आणि लाकडी दरवाजाचा आधार घेत तो गुपचूप मंदिर परिसरात शिरला.

त्यानंतर त्याने गर्भगृहाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि लोखंडी टॉमीच्या साहाय्याने मंदिरातील दानपेट्या फोडल्या.

दानपेटीत जमा झालेली सुमारे ६० हजार रुपयांची रोकड चोरून तो पसार झाला होता.

पोलिसांनी ८ तासांत आवळल्या मुसक्या

सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आणि भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्याची हालचाल

पोलिसांनी सर्वात आधी मंदिरातील आणि आसपासच्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.

फुटेजमध्ये चोरट्याची हालचाल आणि तो पळून गेलेली दिशा स्पष्ट झाली.

या तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी माग काढत, चोरीच्या घटनेनंतर अवघ्या ८ तासांच्या आत आरोपी संग्राम जाधव याला मंदिरापासून साधारण ४ किमी अंतरावरून ताब्यात घेतले.

चोरीची रक्कम हस्तगत

सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने पोलिसांच्या खाक्या दाखवताच आपला गुन्हा कबूल केला. त्याच्याकडून चोरीला गेलेली सर्व रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे.

नुकताच गणेशोत्सव पार पडल्याने दानपेटीत मोठी रक्कम जमा झाली होती, ज्यावर या चोरट्याने डल्ला मारला होता.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!