Pune Mayor Challenge MPSC student Protest : “पुणे बंद करून दाखवाच, पुणेकर काय आहेत कळेल!” महापौर मंजुषा नागपुरेंचे रोहित पवारांना खुले आव्हान


पुणे बंद करून दाखवाच, मग पुणेकर काय आहेत हे कळेल,” अशा कडक शब्दांत महापौर मंजुषा नागपुरे यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.

महापौर मंजुषा नागपुरे यांनी रोहित पवारांवर साधला निशाणा

पुणे: एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून पुण्याचे राजकारण कमालीचे तापले आहे.

आंदोलनाच्या माध्यमातून पुणे शहर बंद पाडण्याची आक्रमक भूमिका घेणाऱ्या आंदोलकांना आणि आमदार रोहित पवार यांना पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी थेट आणि खुले आव्हान दिले आहे.

“पुणे बंद करून दाखवाच, मग पुणेकर काय आहेत हे कळेल,” अशा कडक शब्दांत महापौरांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.

महापौरांनी मांडली आक्रमक भूमिका

पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडले आहे.

या आंदोलनाला पाठिंबा देत सोशल मीडिया स्टार अभिजीत दिपके यांनी महाराष्ट्रातील सर्व एमपीएससी विद्यार्थ्यांनी पुण्यात यावे आणि पुणे बंद पाडावे, असे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर महापौरांनी आपली आक्रमक भूमिका मांडली.

महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, “पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आहे.

येथे राज्यभरातून लाखो मुले शिक्षणासाठी येतात. पुण्यात शिकलेले ७० टक्के विद्यार्थी येथेच स्थायिक होऊन पुणेकर झाले आहेत.

पुणे शहराने या विद्यार्थ्यांना नेहमीच मायेची उब दिली आहे आणि विद्यार्थ्यांनीही आजपर्यंत पुण्याला कधी त्रास दिला नाही.

मात्र, रोहित पवार आणि काही लोक शहर बंद पाडण्याची भाषा करत आहेत.”

पुढे करांना होणारा त्रास सहन केला जाणार नाही

रोहित पवारांना आव्हान देताना महापौर पुढे म्हणाल्या, “त्यांनी पुणे बंद पाडून दाखवावेच. शहर बंद केल्यास कॉलेजचे विद्यार्थी वेळेवर पोहोचू शकणार नाहीत, रुग्ण रुग्णालयात जाऊ शकणार नाहीत.

यामुळे पुणेकरांना होणारा त्रास सहन केला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी येथे करिअर घडवण्यासाठी यावे. ज्या राजकीय पक्षांना आपला राजकीय स्वार्थ साधायचा आहे, त्यांच्या नादी विद्यार्थ्यांनी लागू नये.”

या आंदोलनाच्या स्वरूपावर शंका उपस्थित करताना महापौरांनी म्हटले की, “आज जे रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, ते खरे विद्यार्थी नसावेत अशी शंका वाटते.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे स्वतः पुण्यात राहतात. त्यांना तरी पुणे शहर बंद पाडणे योग्य वाटते का?”

असा सवालही त्यांनी केला. विद्यार्थ्यांना आपल्या मागण्या मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र त्यामुळे पुणेकरांना कोणताही त्रास होता कामा नये, असे स्पष्ट मत महापौरांनी व्यक्त केले.

महापौरांच्या या विधानानंतर आता रोहित पवार यावर काय पलटवार करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!