लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या शकुंतलाबाई यांचे निधन झाले आहे. अण्णाभाऊ यांच्या कौटुंबिक जीवनाच्या अखेरच्या साक्षीदार होत्या.
अण्णाभाऊ साठे यांच्या कौटुंबिक जीवनाच्या अखेरच्या साक्षीदार
लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यक्तिगत कौटुंबिक जीवनाच्या अखेरच्या एकमेव साक्षीदार शकुंतलाबाई सपताल यांचे दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या स्मृतीस जनवादी लेखक संघ, प्रगतिशील लेखक संघ, लोक सांस्कृतिक मंच, विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि डाव्या-पुरोगामी चळवळीतर्फे क्रांतिकारी अभिवादन.
लोकशाहीर कॉ. अण्णाभाऊ यांच्या द्वितीय कन्या शकुंतला अजित सपताल यांचे २ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे २.४५ वाजता प्रदीर्घ आजाराने वयाच्या ९२ व्या वर्षी नालासोपारा येथील रुग्णालयात निधन झाले.
काही महिन्यांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता आणि त्यानंतर त्यांच्यावर या रुग्णालयातच उपचार सुरू होते. अलिकडे त्या नालासोपारा येथे आपल्या मुला प्रशांत यांच्या घरी राहत होत्या.
३ ऑगस्ट रोजी नालासोपारा येथे जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.
त्यांच्या पश्चात मुलगे संजय, राजेश, प्रशांत, मुलगी नंदिनी आणि नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचा विवाह इस्लामपूर येथील अजित सपताल यांच्याशी खुद्द कॉ. अण्णाभाऊ साठे यांनीच लावून दिला होता.
शकुंतलाबाई बालपणापासूनच कम्युनिस्ट पक्षात सक्रिय
शकुंतलाबाई बालपणापासूनच कम्युनिस्ट पक्षात सक्रिय होत्या. ज्येष्ठ बहिण कॉ. शांताबाई, रोझा डांगे, कमल व सत्येंद्र मोरे, प्रभाकर मिरजकर, सुमन मोकाशी (संझगिरी) आदींसोबत बाल संघात आणि सांस्कृतिक कला पथकात त्या सक्रिय होत्या.
तसेच पक्षाच्या मुखपत्रांची विक्री करण्यात आई कॉ. जयवंताबाई साठे यांच्या समवेत आघाडीवर होत्या.
अण्णाभाऊ साठे चिरागनगरात भूमिगत असताना त्यांना पोलीस ससेमारा चुकवून कम्युनिस्ट पक्षाचे साहित्य व पत्रके गुपचूप भेटून देत असत.
कॉ. अण्णाभाऊ साठेंच्या अनेक कथा-कादंबऱ्यांच्या त्या प्रथम वाचक होत्या.
अण्णाभाऊंचे अक्षर समजायला अवघड (गिचमिड) असल्याने त्यात त्या सुधारणा करीत. त्यांना स्वतःलाही लिखाण व साहित्याची आवड होती.
अण्णाभाऊंच्या अविस्मरणीय आठवणींचे लेखन
कॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या निधनानंतर त्यांनी अण्णाभाऊंच्या अविस्मरणीय आठवणींचे लेखन काही दिवाळी अंकांत केले होते.
त्यातील ‘फकिरा’ कादंबरी लेखनासंदर्भातील आठवण विशेष हृदयद्रावक होती. अण्णाभाऊंच्या साहित्याची व राजकीय कार्याची त्यांना चांगली जाण होती.
कॉ. अण्णाभाऊ साठे यांनी आपले एक पुस्तक शकुंतलाबाई आणि शांताबाई या मुलींना अर्पण केले आहे.








