डीजे विरोधात पुण्यात मोर्चा काढून बंदीची मागणी करण्यात आली यावेळी राजकीय नेत्यांनी बंदीच्या समर्थनार्थ सुर लावला.
‘डीजे’च्या दणदणाटाविरोधात शेकडो नागरिक रविवारी रस्त्यावर
पुण्यात वाढत्या ध्वनीप्रदूषण आणि ‘डीजे’च्या दणदणाटाविरोधात शेकडो नागरिक रविवारी रस्त्यावर उतरले असून, त्यांनी काढलेल्या भव्य मोर्चात ‘डीजे’वर संपूर्ण बंदी घालण्याची आग्रही मागणी केली.
या आंदोलनाला सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंच्या राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधील डीजेच्या वापराबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट असून, प्रशासन विद्यमान कायदेशीर नियमांनुसारच कारवाई करेल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे.
‘लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंच’चा पुढाकार
सार्वजनिक उत्सवातील गोंगाटाविरोधात पुण्यात विद्यानंद बापट यांनी आवाज उठवला होता.
‘स्पीकरच्या भिंतींवर’ बंदी घालावी आणि ढोल-ताशा पथकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करूनच वादन करावे, अशी त्यांची मागणी होती.
या मागणीसाठी गेल्या आठवड्यात एका वृत्तवाहिनीशी बोलताना बापट यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी ‘लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंच’च्या आवाहनावरून पुणेकर एकत्र आले.
जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक ते महानगरपालिका दरम्यान निघालेल्या या मोर्चात नागरिकांनी “शांतता आमचा हक्क आहे” आणि “डीजे बंदी झालीच पाहिजे” अशा तीव्र घोषणा दिल्या.
सुरक्षेच्या कारणास्तव विद्यानंद बापट अनुपस्थित
पुण्यात दणदणाटाविरोधात सर्वात आधी आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांच्यावर गेल्या आठवड्यात एका तरुणाने हल्ला केला होता.
याच सुरक्षेच्या कारणास्तव बापट या मोर्चात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकले नाहीत.
मात्र, त्यांच्या अनुपस्थितीतही पुणेकरांनी त्यांच्या या मागणीला मोठे बळ दिल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले.
“सोलापूर, मुंबई आणि नागपूरमध्ये डीजेबंदी होऊ शकते, तर पुण्यात का नाही?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
सण-उत्सवासाठी नियमावली हवी: राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या मुद्द्यावर सण-उत्सवांच्या पारंपारिक पद्धतींचे समर्थन केले.
“सण-उत्सवांमध्ये डॉल्बी आणि डीजे का लावता? आपले सण पारंपरिक पद्धतीने का साजरे होत नाहीत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तसेच, गोविंदांच्या मंचावर होणारे डान्स ही उत्तरेकडील संस्कृती असून महाराष्ट्राने याचे अनुकरण करू नये, असे सांगत त्यांनी उत्सवांसाठी कडक नियमावलीची गरज अधोरेखित केली.








